मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा ‘चॅटबॅाट’ लोकार्पण व सामंजस्य करार पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील असून ही डेमोग्राफिक अॅडव्हान्टेज देशाच्या विकासासाठी मोठी संधी आहे. या युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर चॅटबॉट’ करणार आहे. एआय आधारित ‘चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.
महाराष्ट्राला अधिक बळकट करू – मंत्री लोढा
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विभागात अनेक अभिनव योजना व उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रात काम करणार्या हजारो संस्था राज्यात कार्यरत असून, त्या सर्वांना एकत्र आणून कौशल्य विकासाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा विभागाचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात काही नोकर्यांवर परिणाम होणार असला, तरी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या संधींचे सोने करण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रभावीपणे काम करीत असून महाराष्ट्रातील युवा शक्तीला जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.